श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी

तालुका- पाथर्डी, जिल्हा- अहमदनगर महाराष्ट्र - ४१४ १०६

इतिहास

सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा पूर्व- पश्चिम दिशेने पसरलेल्या आहेत. या रांगामध्ये गर्भगिरी पर्वतरांगा अहमदनगर बीड जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. हा परिसर निसगरम्य असून गर्भागिरीच्या पर्वत रांगेत खळखळ वाहणाऱ्या पानागिरी नदीशेजारी उंचटेकडीकाठी सुंदर असे म गाव आहे व अशा या पवित्र आणि मंगल गावात उच टेकडीवर ब्रम्हचैतन्य श्री कानिफ़नाथ महाराजानी श्री क्षेत्र वॄध्देश्वर येथे सर्व देविदेवतांच्या महायज्ञामध्ये ठरल्याप्रमाणे १० व्या शतकामध्ये फ़ाल्गुन वैद्य रंगपंचमीला संजीवनी समाधी घेतली.अहमदनगर येथून ५५ कि.मी. तर पाथर्डी तालुक्यापासुन १२ कि.मी. अंतरावर समॄध्द संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करणारे आदर्श गाव व नाथपंथीयांचे अद्यपीठ म्हणून भारतभर प्रसिध्द असलेले हे स्थान सर्वांचेच श्रध्दास्थान बनले आहे.

महाराणी येसूबाईनी छत्रपती शाहु महाराजांची औरंगजेब बाद्शहाच्य़ा कैदेतून सुटका होण्यासाठी नाथांना केलेल्या नवसपुर्तीपोटी सरदार पिलाजी गायकवाड व कारभारी चिमाजी सावंत यांची नेमणूक करुन मंदिर व गडाचे बांधकाम करुन घेतले व बांधकामासाठी पाणी मिळावे म्हणून शुरवीर राणी अहिल्याबाई होळकर यांनी तीन ऐतिहासिक बारवखोदून त्यांचे बांधकाम करुन दिले. त्यामध्ये एक गौतमी बावर असून अनेक भाविक तिर्थ म्हणून य़ा पवित्र पाण्य़ाचा आजही उपयोग करतात. तसेच छ्त्रपती शिवरायांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या वडीलांनी (वंशास दिवा देण्याच्या नवसपुर्तीपोटी) मुलाचे नाव कान्होजी ठेवून सदोदीत तेवणारा नंदादीप व पंचधातुंचा घोडा श्री कानिफ़नाथ चरणी अर्पंण केला तो आजही मंदिरात आहे.

गडावर येण्य़ासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. पूर्व दरवाजाला दोनशे पायऱ्या आहेत. मंदिराच्या उत्तरेला एक डाळींबाचे झाड असून डालीबाई या महिला शिष्येने नाथसंप्रदायामध्ये सामील होण्यासाठी श्री कानिफ़नाथ महाराजांनी समाधी घेतल्याचा शोक करत असतानाच फ़ाल्गुन पाडव्याला श्री कानिफ़नाथ महाराज तिच्या दर्शनासाठी पुन्हा प्रकट झाले म्हणून वार्षिक उत्सवात रंगपंचमीला समाधीदिन सोह्ळा व गुढीपाडव्याला नाथांचा प्रगटदिन सोहळा साजरा केला जातो.प्रकट झालेल्या ठिकणी एक डाळींबीचे झाड असून महिला शिष्येची खडतर तपश्चर्या लक्षात घेउन भाविकाने तिचेकडे व्यक्त केलेली मनोकामना या झाडाला नाडा बांधल्यावर पूर्ण होतात व ते झाड वर्षानुवर्षे त्या ठिकाणी कायम राहुन भाविकांच्या इच्छेची पूर्तता करत आहे.